Tuesday, June 29, 2010

कामाची प्रक्रिया

कामाची प्रक्रिया

संतोष आणि मी (धिरज) ज्यावेळेस अभ्यास प्रकल्प सुरू केला त्यावेळेस आमचा विषय “मुंबईतील प्रार्थनास्थळे आणि तेथे बोलले जाणारे नवस”, याच अनुषंगाने “तरुण आणि तरुणी नवस बोलतात का?” असा होता. ह्यावर चर्चा करता करता मग ध्यान केंद्र मग पुढे “नविन अध्यात्मिक केंद्रांकडे तरुण का आकर्षित होतात” हा असा झाला. त्यासाठी प्रथम आम्हाला मागिल काही वर्षात नव्याने सुरू झालेल्य़ा अध्यात्मिक केंद्रांबद्दल माहिती मिळवावी लागली.
सुरूवातीला आम्हाला अनिरुध्द बापू, अम्मा, श्री श्री रवीशंकर, सत्यसाई बाबा या व्यक्तींबद्दल वरचेवर माहिती होती असे म्हणण्यापेक्षा फक्त नावं माहिती होती. त्यांच्या मठात किंवा केंद्रात नक्की काय चालते हे बिलकूल माहित नव्हते. सदर अभ्यास प्रकल्पाच्या अनुशंगाने ह्या सा-यांबद्दल माहिती मिळवण्याची संधी मिळाली.
प्रथम इंटरनेटवर काही माहिती मिळते का पाहिले, त्यातूनच आम्हाला काही अध्यात्मिक केंद्रांचे पत्ते मिळाले. हा धागा पकडत आम्ही पुढे या स्थळांना भेटी देण्यास सुरूवात केली. सुरूवातीला भेटी देताना आम्हाला असे ही निदर्शनास आले की पत्ता तर आहे पण ते केंद्र उपलब्ध नाही, अथवा ते केंद्र त्या स्थळावरून दुसरीकडे हलवण्यात आले आहे, अथवा त्या केंद्रात अध्यात्म संबंधित कुठल्याही प्रकारचे कार्य न चालता फक्त अत्याधुनिक व्यायामशाळा आहे. थोडक्यात काय तर डोंगर पोखरुन उंदिर शेधण्याचे काम चालू होते.
जी केंद्र आम्हाला खरंच अध्यात्मिक दृष्टीने काम करणारी वाटली तेथे भेटी देण्याचे प्रमाण वाढवले. स्वतःबद्दल तसेच आमच्या कामाबद्दल सविस्तर माहिती सांगितली. आम्ही काय माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्याचा उपयोग काय आणि कसा करणार आहोत त्याबद्दल सविस्तर माहिती दिली. पण आम्हाला योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. केंद्र प्रतिनीधींकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात होती.
केंद्र संचालक, केंद्रातील स्वयंसेवक किंवा कर्मचारी यांच्या कडून सरळ माहिती मिळेल याची शक्यता कमी झाल्याने आम्ही मग केंद्रात जाणा-या किंवा साधना करणा-या साधकांची केंद्राबाहेर मुलाखत घेण्याचे ठरवले. त्यासाठी आम्ही प्रश्नावली तयार केली.
ज्या केंद्राची माहिती आम्हाला मिळाली त्या केंद्राची जागा दाखवण्यासाठी इंटरनेट वरील गुगल मॅप म्हणजेच जी मॅपचा वापर केला. त्यावर ह्या केंद्रांच्या जागा चिन्हांकित केल्या. ज्या केंद्रांना भेटी दिल्या त्या केंद्रांसाठी वेगळ्या रंगाचे चिन्ह वापरले.
हे सारे करण्यासाठी प्रथम संगणकावर हे कसे केले जाते ते शिकून घेतले, कारण जी मॅप हे आमच्यासाठी नविन होते आणि त्याबद्दल शिकून घेणे प्रॉजेक्टच्या दृष्टीने गरजेचे होते. तसेच ब्लॉग तयार करणे, त्यात माहिती टाकणे हे सारे नव्याने शिकून घेतले.
तयार केलेल्या प्रश्नावलीच्या आधारे आम्ही साधकांच्या मुलाखती घेण्यास सुरूवात केली. जो जसा उपलब्ध होईल त्याप्रमाणे त्या साधकाला भेटून मुलाखती घेत होतो. हळुहळू माहिती म्हणजेच डेटा जमा होत होता. काही छायाचित्र घेतले म्हणजेच फोटोग्राफी केली. मुलाखतीचे दृकश्राव्य माध्यमातून चित्रण म्हणजेच व्हीडीओ शुटींग करण्याचा प्रयत्न केला.
जमलेल्या माहितीचे विश्लेषण म्हणजेच अनालिसस करणे ही गरजेचे होते कारण त्यातूनच बरीचशी उकल होऊन आम्ही ठामपणे काही सिध्द करू शकणार होतो. म्हणूनच पुढे जमवलेल्या माहितीची योग्य पध्दतीने मांडणी करून त्यातील सामाईक भाग वेगळा केला. प्रत्येक प्रश्नासाठी टक्केवारी काढली. या टक्केवारीच्या आधारे आम्ही आमची ठाम मते आणि निष्कर्ष मांडू शकलो

By
Dhiraj Patil